हैदराबाद । तेलंगणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनानं ड्युटीवर तैनात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धडक दिल्याची घटना समोर आलीय. परितोष पंकज असं या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव असून या घटनेत हा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तेलंगणाच्या भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलममध्ये ही घटना घडली आहे. सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी हे भद्राचलमच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना भेटायला आलेल्या मंत्र्यांपैकी एका मंत्र्याच्या ताफ्यातील एका वाहनानं बंदोबस्ताच्या ड्युटीवर तैनात असलेल्या परितोष पंकज यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
https://twitter.com/PTI_News/status/1767395128501739773
अपघातामध्ये परितोष पंकज हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबादला हलवण्यात आलं आहे. अधिकाऱ्यानं सांगितलं की, या अपघातामध्ये पारितोष पंकज यांच्या उजव्या डोळ्याजवळ फॅक्चर झालं आहे. त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं असून, ते सध्या हैदराबादमधील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Discussion about this post