जळगाव । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच शहरातील रेमंड चौफुली जवळ पायी जाणाऱ्या तरुणाला अज्ञात कारने जोरदार धडक दिली. यात तरुण गंभीर जखमी झाला होता उपचार सुरु असताना तरुणाचा मृत्यू झाला. भुषण पवनकुमार जैन वय ३४ रा. शिवराम नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुषण जैन हा तरूण आपल्या आई पवनाबाई यांच्यासोबत शिवराम नगरात वास्तव्याला होता. तो मुंबईत खासगी नोकरीला होता. काही दिवसांपासून भूषण हा घरी जळगावात आलेला होता. रविवारी रात्री रेमंड चौफुलीवरून तो पायी जात असतांना त्याला अज्ञात कारने जोरदार धडक दिली. या अपघातात भूषण हा गंभीररित्या जखमी झाला.
त्याला जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालात दाखल करण्यात आला. याठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरूणाच्या पश्चात आई आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.















Discussion about this post