जळगाव : “मी आपल्यासोबत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत बातचित करायला आलो आहे. तरुण मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की, उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ही निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी ही निवडणूक आहे. पण या गैरसमजात राहू नका. येणारी निवडणूक ही 2047 मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवण्यासाठी आहे, ही निवडणूक भारताच्या तरुणांची आणि भारताच्या भविष्यासाठी आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
जळगावात भाजप युवा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अमित शाह यांनी युवकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांचं सरकार होतं तेव्हा बॉम्बस्फोट व्हायचे. दहशतवादी भारतात येऊन बॉम्बस्फोट करुन पळून जायचे. काहीच प्रत्युत्तर दिलं जायचं नाही. मोदीजी आले उरी आणि पुलवामामध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. दहाच दिवसात पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्टाईक आणि एअर स्ट्राईक करुन आतंकवाद्यांना संपवलं”, असं शाह म्हणाले.
सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. उद्धव ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवार यांना सुप्रियाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. ममता बॅनर्जींना भाच्याला मुख्यमंत्री करायचं आहे. तुमच्यासाठी कोणीच नाही. पण तुमच्यासाठी मोदी आहे. मोदींनी विकसीत भारताचं लक्ष ठेवलं आहे. महान भारताचं टार्गेट ठेवलं आहे. मोदींनी दहा वर्ष भारताला सुरक्षित ठेवण्याचं काम केल्याचं अमित शाह म्हणाले.
Discussion about this post