बालासोर : ओडिशामध्ये खूप मोठा रेल्वे अपघात घडला आहे. ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेस (१२८४१) आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली.या अपघातात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 179 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोमंडलच्या 4 बोगी रुळावरून घसरल्या आहेत. अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर 179 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर 30 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सायंकाळी 6.51 च्या सुमारास हा अपघात झाला. त्याचवेळी रेल्वेच्या उलटलेल्या डब्यात अनेक प्रवासी अडकल्याची बाब समोर येत आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय 32 जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.
दुसरीकडे, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, लोकांना नेण्यासाठी सुमारे 50 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेस बोलाण्यात आल्या आहेत.
विशेष मदत आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे.
याशिवाय ट्रॅक साफ करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. डीजीपी अग्निशमन सेवा डॉ. सुधांशू सारंगी हेही मुख्यालयातून अपघातस्थळी रवाना झाले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकार बचावकार्यासाठी जनरेटर आणि लाईटची व्यवस्थाही करत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मंत्री प्रमिला मल्लिक आणि विशेष मदत आयुक्तांना तातडीने अपघातस्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले.
Discussion about this post