रायगड : दुर्गराज रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सोहळ्यात उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित करत तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊ..
रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवभक्तांना संबोधित केले. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रताप गडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणाही करण्यात आली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष उदयनराजे भोसले असतील. तर शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर देण्यात येणार असून जनकल्याणाचा शिवसंकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. शिवरायांच्या कल्पनेतील सुराज्य आणणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आज सोहळ्याला आपण उपस्थित आहोत, हे आपलं भाग्य आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे. शिवरायांच्या विचारांवरच आपल्या सरकारचा कारभार आहे. रयतेच्या हक्कांचं रक्षण करणार हे आपलं सरकार आहे, असं त्यांनी सांगितलं.