जळगाव : जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण काही केल्या कमी होत असून अशातच जळगाव- कानळदा रस्त्यावर सुसाट वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुण ठार झाला. पंकज राजेंद्र मराठे (वय ३४) असं मयत तरुणाचे नाव आहे. तर सोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाला.
कानळदा (ता. जळगाव) येथील पंकज राजेंद्र मराठे हा तरुण जळगाव शहरात गादी कारखान्यात कामाला होता. २४ फेब्रुवारीला रात्री सहकारी गोपाल पाटील याच्या सोबत दुचाकीवर जळगाव येथून घरी जाण्यासाठी निघाला. या जळगावपासून काही अंतरावर असलेल्या आव्हाणे फाट्याजवळील एका वळणावर कानळदाकडून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे खाली पडले.
या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीवरील दोघांना नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र येथे पंकज मराठे याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर गंभीर जखमी गोपाल पाटील याच्यावर खासगी रुग्णालयात उपचारासाठी रावण केले असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post