जळगाव । उत्तर व पश्चिम भारतात होत असलेल्या नियमित हवामानातील बदलामुळे पश्चिमी विक्षोभाची (वेस्टर्न डिस्टर्बन्स) स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल पाहायाला मिळत आहे. दरम्यान, जळगावातील तापमानात गेल्या काही दिवसात मोठा बदल पाहायला मिळाला. रविवारी पहाटे जळगाव जिल्ह्याचा पारा १२ अंशांवर घसरला. शुक्रवारी तो १४ अंशांवर होता. दुसरीकडे सोमवारी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
जळगावात सकाळी थंडी तर दुपारी कडक उन्हें नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. मात्र, वातावरणातील झालेल्या बदलामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असून व्हायरल रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान, आज म्हणजेच २६ फेब्रुवारी पासून ते १ मार्चपर्यंत तापमानात तीन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचे चटके जाणवणे साहजिक आहे. कमाल तापमान ३६ ते ३७ अंश तर किमान १६ ते २१ अंश राहील. २८ आणि २९ फेब्रुवारी दरम्यान जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. शाळा व महाविद्यालयांत देखील बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, अंगदुखी तसेच तापाचा त्रास जाणवत आहे. हे व्हायरल इन्फेक्शन असल्याने एकापासून दुसऱ्याला लगेच लागण होत आहे. दरम्यान, वातावरणातील हा बदल आठ दिवस राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय.
Discussion about this post