जळगाव :- पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार सन 2023 मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष या 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होणेबाबत अथवा न होणेबाबत घोषणपत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यतील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहित धरण्यात येईल. व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातुन वजा करण्यात येईल.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.
ही योजना मृग बहार सन २०२२ मध्ये जळगाव जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लि., टोल फ्री क्र.:१८००४१९५००४, दूरध्वनी क्र. ०२२-६१७१०९१२, ई-मेल-pikvima@aiccfindia.com या विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संसथा/ बँक/आपले सरकार सेवा केंद्र/विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे/ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक याप्रमाणे आहे.
मृग बहार – फळ पिकाचे नाव – संत्रा, द्राक्ष, पेरु, लिंबू- विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 14 जून, 2023 आहे. तर मोसंबी, चिकू साठी 30 जुन, डाळिंबसाठी-१४ जुलै, सिताफळसाठी ३१ जुलै, २०२३ अशी आहे.
मृग बहार सन २०२३ या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी करण्यात आला असून निर्धारीत केलेले हवामान धोके (Weather Triggers) लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत देय होणार आहे. मृग बहारातील अधिसूचित फळपिकांची विमा नोंदणी करण्याकरीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल https://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बैंक/वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. मृग बहारातील अधिसूचित फळपिकांचे हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम, विमा संरक्षण कालावधी, विमा हप्ता इत्यादी बाबती सविस्तर माहितीचा 18 जून, 2021 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov व कृषि विभागाच्या http://www.kshi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ई सेवा केंद्र व बैंक स्तरावरही याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याच्या सुचना कृषी विभागाने सहभागी विमा कंपन्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनीचे जिल्हा/तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे कृषि विभागाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000