आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबु्ग्गा स्थित वेंकटेश्वर स्वामी मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त आज भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला. तर, अनेक भाविक जखमी असल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून काशीबु्ग्गा स्थित वेंकटेश्वर स्वामी मंदिरात गर्दी गेली होती. भाविकांची सकाळपासूनच अलोट गर्दी पाहायला मिळाली. प्राथमिक माहितीनुसार, मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दी वाढली. ज्यामुळे भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. नंतर काही वेळातच गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. भाविक एकमेकांच्या अंगावर कोसळू लागले.
काशिबुग्गा वेंकटेश्वर मंदिर हे १२ एकरवर पसरलेले आहे. दूरदूरून भाविक याठिकाणी दर्शनाला येत असतात. चेंगराचेंगरीनंतर मंदिर परिसरात अनेक भाविक जमिनीवर निपचित पडल्याचे दिसले. इतर भाविकांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. तसेच उपचारासाठी तातडीने रुग्णालयात त्यांना हलवले.
दरम्यान, प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवले असून, परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे आणि मंदिर व्यवस्थापनाच्या नियोजन आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post