तमिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील एका फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला असून यात ८ कामगारांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा स्फोट इतका भीषण होता की ज्या घरामध्ये कारखाना सुरू होता ते घर पूर्णपणे कोसळले आणि जवळपासच्या अनेक इमारतींचे नुकसान झाले.या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. स्फोटानंतर आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस आले आणि पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीमसह स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
प्राथमिक तपासात कारखान्यातील केमिकल मिक्सिंग रूममध्ये स्फोट झाल्याचे समोर आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जणांचा चिरडून मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, आतापर्यंत या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ महिलांचा समावेश आहे. सहा गंभीर जखमींना शिवकाशी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Discussion about this post