जालना । जालना-राजूर मार्गावरील वसंतनगर शिवारात अपघाताची भयानक घटना समोर आली आहे. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात गावाकडे परतणाऱ्या वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळल्याने सातजणांचा बुडून मृत्यू झाला.सुदैवाने सातजणांचे प्राण बचावले.
चनेगाव आणि तपोवन येथील भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन ते बसने गुरुवारी दुपारी जालना शहरात आले. त्यानंतर एका जीपमध्ये बसून ते गावाकडे निघाले होते. जालना-राजूर मार्गावरील वसंतनगर शिवारात समोरून आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात जीपचालकाचा ताबा सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. दरवाजाची काच फुटल्याने जीपचालक बाहेर आला. शेतात काम करणारे नागरिक मदतीला धावून आले
जीप क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. जीपमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती कोणीच देऊ शकत नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनाच्या पंपाचा उपयोग करून विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात आले. खाली कोणी नसल्याची खात्री झाल्यानंतरच रात्री उशिरा सर्वजण निघून गेले.
अशी आहेत मृत व जखमींची नावे :
प्रल्हाद उत्तम महाजन (वय ६०), नंदाबाई बाळू तायडे (३५), प्रल्हाद आनंद बिटले (६५), नारायण किसन निहाळ (४५), चंद्रभागाबाई अंबादास घुगे (सर्व रा. चनेगाव, ता. बदनापूर), ताराबाई भगवान मालुसरे (रा. तपोवन, ता. भोकरदन) या सहा वारकऱ्यांचा समावेश आहे, तर रंजना कैलास कांबळे (३५, रा. शास्त्री मोहल्ला, जुना जालना) ही मृत महिला प्रवासी म्हणून जीपमध्ये बसली होती. हिम्मत चव्हाण, भगवान मालुसरे, ताराबाई गुळमकर, सखुबाई महाजन (रा. तपोवन), आरती तायडे, अंबादास घुगे (रा. चनेगाव), अशोक पुंगळे (रा. राजूर) हे सातजण बचावले आहेत. जखमींवर राजूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले
Discussion about this post