जळगाव : जिल्ह्यातील चोपडा येथे रस्ता लुटीच्या प्रयत्नात असलेल्या सात सराईत आरोपींना चोपडा पोलिसांनी अटक केली. यापूर्वी खून, दरोडा, खंडणीसह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सर्व संशयितांकडून दोन गावठी बंदुका, तलवारी, मॅगझीन, भ्रमणध्वनी आणि चारचाकी, असा सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत असे की, २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गोपनीय माहिती मिळाली की, शिरपूर बायपास रोडवर एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये काही संशयीत इसम बराच वेळ थांबलेले आहेत.या माहितीवरून तात्काळ पोलीस पथक तयार करण्यात आले.
पथकाने रणगाडा चौकाच्या पुढे, बायपास रोडच्या बाजूला थांबलेल्या MH २६ CH १७३३ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारचा शोध घेतला. यावेळी कारच्या बाहेर दोघे जण पहारा देत उभे होते आणि पाच जण आत बसलेले होते, असे एकूण सात संशयीत आरोपी आढळले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस पथकाने तात्काळ घेराव घालून या सातही आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींची आणि त्यांच्या कारची झडती घेतली असता, त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये: दोन आरोपींच्या कमरेला लोड केलेले (काडतूस भरलेले) दोन गावठी कट्टे (पिस्टल) मिळून आले. गाडीत दोन धारदार तलवारी आणि एक रिकामे मॅगझीन (Magazine) देखील सापडले. याशिवाय आरोपींचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एकूण १३ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल (गाडी, शस्त्रे, मोबाईल, रोख) जप्त करण्यात आला आहे.
विक्रम बाळासाहेब बोरगे (२४, रा. वैजापुर जि. संभाजीनगर), दिलीपसिंग हरीसिंग पवार (३२), अनिकेत बालाजी सुर्यवंशी (२५), अमनदिपसिंग अवतारसिंग राठोड (२५), सद्दामहुसेन मोहंमद अमीन (३३, सर्व रा. नांदेड), अक्षय रवींद्र महाले (३०), जयेश राजेंद्र महाजन (३०, दोन्ही रा. चोपडा, जि. जळगाव), अशी पोलिसांच्या ताब्यातील संशयितांची नावे आहेत.
पैकी, दोन संशयित हे एपीडीए अंतर्गत झालेल्या स्थानबध्दतेच्या कारवाईतून नुकतेच कारागृहातून बाहेर आले होते. एक संशयित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील दरोडा तसेच शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात फरार आहे. चोपडा येथील एका संशयितावर यापूर्वी अग्निशस्त्र बाळगल्यासह दंगलीचे गुन्हे नोंद आहेत. सर्व सात संशयित संगनमताने रस्ता लुट आणि दरोड्याची तयारी करून सशस्त्र स्थितीत एकत्र जमल्याचे निष्पन्न झाले. ताब्यातील चार संशयितांची नांदेड शहरात मोठी दहशत असून, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसुली करण्यासह खंडणीसाठी अपहरण, विवस्त्र करून लोकांचा छळ करण्याची कृत्ये केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.















Discussion about this post