जालना : महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांनंतर काँग्रेसने कठोर भूमिका घेत जालना महानगरपालिकेतील सात नगरसेवकांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करत भाजपला उघडपणे साथ दिल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
माहितीनुसार, दोन मार्च रोजी जालना महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीदरम्यान संबंधित नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप आहे. या घटनेला पक्षशिस्तीचा भंग मानत काँग्रेसने चौकशी केली होती. चौकशी अहवालात आरोप सिद्ध झाल्याचे नमूद करण्यात आल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली.
काँग्रेसकडून पुढील आदेश येईपर्यंत संबंधित सातही नगरसेवकांचे निलंबन कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जालना महापालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोणाकोणाला निलंबन केलं?
१. फरूक सादीक तुंडीवाले
२. इम्रान खान आमानुलला खान
३. फरहाना अ. रऊफ अंसारी
४. सुनिल अशोक बोरडे
५. मयूरी दिनेश वेने
६. रुबीना मजीद पठाण
७. अनिल अशोक तिरुखे















Discussion about this post