जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या दोन लाख पंच्याहत्तर हजारापेक्षा अधिक उत्तरपत्रिकांचे ऑनलाईन मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे.
विद्यापीठाने माहे मार्च/एप्रिल/मे, २०२३ मध्ये ३३ अभ्यासक्रमांच्या विविध वर्गांच्या, विविध विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या होत्या. या परीक्षांना नियमित व पुनर्परीक्षार्थींसह १ लाख ७५ हजार विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा निकालाची कार्यवाही ३० ते ४५ दिवसांच्या आत पूर्ण होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील ७० महाविद्यालयांत विविध विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन मूल्यांकनाच्या कार्यवाहीला ५ मे पासून प्रारंभ झाला आहे. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या तपासणी केंद्रावर ३०० पेक्षा अधिक प्राध्यापक उत्तरपत्रिका ऑनलाईन मूल्यांकनाचे काम करीत आहेत. एकूण ४ लाख ६० हजार उत्तरपत्रिकांपैकी २ लाख ८१ हजार उत्तरपत्रिकांचे ऑनलाईन मूल्यांकनाचे कामकाज आजपर्यंत पूर्ण झाले आहे.
म्हणजे एकूण ६०टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच आवश्यक आहे तेथे २३ हजार उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी (मॉडरेशन) देखील करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात कुलगुरु, प्र-कुलगुरु, अधिष्ठाता यांनी उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांना भेट देऊन प्राध्यापकांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्राध्यापकांच्या सहकार्यामुळे हे काम प्रगतीपथावर असून विहीत मूदतीत काम पूर्ण होईल असा विश्वास कुलगुरुंनी व्यक्त केला आहे. या ७० केंद्रांपैकी नाहाटा महाविद्यालय, भुसावळ येथे २८ हजार ७१२, एस.पी.डी.एम. शिरपूर येथे १४ हजार ३७९, किसान महाविद्यालय, पारोळा येथे १४ हजार ०३३, खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे ९ हजार ११४, पीएसजीव्हीपीएस महाविद्यालय, शहादा येथे १० हजार ६४४, जयहिंद महाविद्यालय, धुळे येथे ११ हजार ८५४ , आर.सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर येथे ११ हजार ४८६ उत्तरपत्रिकांचे ऑनलाईन मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. कुलगुरु महोदयांच्या आवाहनाला प्राध्यापक प्रतिसाद देऊन सहकार्य करीत असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल यांनी सांगितले.
Discussion about this post