एकीकडे उत्तर प्रदेशमधील अलिगडमध्ये सासू आणि जावई यांच्यातील लग्नाचा मुद्दा चर्चेत असताना, ५० वर्षीय आजीने पळून जाऊन ३० वर्षीय नातवासोबत लग्न केलं. हे प्रकरण बसखारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रतापपूर बेलवरिया गावातील आहे. सध्या या गावासोबत संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये आजी-नातवाच्या प्रेम कहाणीची चर्चा होत आहे.समाजाला झुगारून हे दोघे जण पळून गेले आणि त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केले.
बेलवरिया गावामध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय इंद्रावतीचे तिच्याच शेजारी राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणासोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ३० वर्षीय आझाद इंद्रावतीचा नातू देखील लागतो. वयातील फरक आणि कौटुंबिक नात्यांची भिंत त्यांच्या प्रेमाला रोखू शकली नाही. हळूहळू दोघांमधील जवळीक इतकी वाढली की त्यांनी सर्व सामाजिक बंधने तोडून एकत्र राहण्याची शपथ घेतली.
इंद्रावतीला चार मुलं आहेत. तिला दोन मुली आणि दोन मुलं आहेत. तिच्या एका मुलीचे आधीच लग्न झाले आहे. पती आणि ४ मुलांना टाकून इंद्रावती प्रियकरासोबत पळून गेली. दोघांनी गोविंदसाहेब मंदिरात सात फेरे घेत लग्न केले. लग्न केल्यानंतर दोघेही गावातून पळून गेले. अशी देखील माहिती समोर आली आहे की, पळून जाण्यापूर्वी इंद्रावतीचा नवरा चंद्रशेखरने दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पकडले होते. या प्रेमसंबंधाला विरोध असताना देखील दोघे वेगळे झाले नाही.
इंद्रावती आणि आझाद यांनी आपल्या मुलांच्या जेवणात विष मिसळण्याचा कट रचला होता असा आरोप इंद्रावतीच्या नवऱ्याने केला आहे. त्याने याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पण काहीच फायदा झाला नाही. नातवासोबत लग्न केल्यामुळे नाराज झालेल्या चंद्रशेखरने आता आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे मानले आहे. त्याने पत्नीच्या तेराव्याची देखील तयारी सुरू केली आहे. चंद्रशेखरचे इंद्रावतीसोबतचे हे दुसरे लग्न होते. शेजारी राहणाऱ्या नातवासारख्या तरुणाच्या प्रेमात पडून त्याच्याशी आजीने लग्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Discussion about this post