जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ गुरुवार, दि. २९ रोजी सकाळी ११:१५ वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील उपस्थित होते.
या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल रमेश बैस हे अध्यक्षस्थानी ऑनलाइन हजर राहणार आहेत. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, नवी दिल्लीच्या सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल यांचे दीक्षांत भाषण होणार आहे. एकूण १९,७१६ विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली जाणार आहे. गुणवत्ता यादीतील ११८ विद्यार्थ्यांना या समारंभात सवर्णपदक दिले जाणार आहे. यामध्ये ७७ विद्यार्थिनी व ४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एक सुवर्णपदक समान गुणांमुळे तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक स्वरूपात विभागून देण्यात आलेले आहे. २०५ पीएच.डी. धारक विद्यार्थी देखील पदवी घेणार आहेत.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्नातकांसाठी डिग्री कोड देण्यात आला आहे. याशिवाय मोबाइल मॅसेजद्वारे देखील डिग्री कोड पाठविण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जे विद्यार्थी या सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना १ मार्च ते ३० मार्चपर्यंत विद्यापीठाच्या पदवी प्रदान विभागातून कार्यालयीन वेळेत ओळख दर्शक पुरावा दाखवून पदवी प्रमाणपत्र दीक्षांत समारंभ संपल्यानंतर घेता येईल.
असा असेल ड्रेस कोड
समारंभात सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट, पांढऱ्या रंगाची पँट किवा पांढऱ्या रंगाचा नेहरू शर्ट आणि पांढऱ्या रंगाचे चुस्त, तर विद्यार्थिनींसाठी लाल किनार असलेली पांढरी साडी, लाल रंगाचे ब्लाऊज किंवा लाल रंगाचा कुर्ता (कमीज) व पांढऱ्या रंगाची सलवार अशा पोशाखात उपस्थित राहावे. दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना विशिष्ट पोशाखाची सवत्ती नाही.
Discussion about this post