नवी दिल्ली । निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राजधानी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात इंडिया आघाडीतील पक्षाचे 300 हून अधिक खासदार सहभागी झाले. त्यामध्ये राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार, संजय राऊत, ठाकरे गटाचे खासदार आणि दक्षिण भारतातील खासदार सहभागी झाले.
संसदेच्या मकर द्वार ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला असून काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी आंदोलन करताना तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती बिघडली.
यावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि संजय राऊत यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या मोर्चादरम्यान इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांनी आणि खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘निवडणूक आयोग चोर आहे, मतचोरी थांबवा, लोकशाही वाचवा…’, अशा घोषणाबाजी करण्यात येत आहेत.
बिहारमधील निवडणुकांसाठी विशेष सारांश सुधारणा (SIR) आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आणि खासदारांनी एकत्र येत संसद भवनाताली मकर द्वाराजवळ राष्ट्रगीत गायले आणि त्यानंतर मोर्चाला सुरूवात केली. इंडिया आघाडीचे सर्व नेते आणि ३०० खासदार पायी चालत निवडणूक आयोगाच्या दिशेने निघाले होते. पण पोलिसांनी हा मोर्चा रोखला.
पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, संजय राऊत, अखिलेश यादव आणि सागरिका घोष यांच्यासह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना ताब्यात घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, ‘ते घाबरले आहेत. सरकार भित्रे आहे.’ तर राहुल गांधी यांनी सांगितले की, बोलू शकत नाही हे सत्य आहे. कारण सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकिय नाही तर संविधान वाचवण्याची लढाई आहे. वन मॅन वन वोटची लढाई आहे. त्यामुळे आम्हाला प्युओर मतदार यादी पाहिजे.’
Discussion about this post