मुंबई । बिघाड झालेल्या सिग्नल यंत्रणेत दुरुस्ती करताना लोकल ट्रेनच्या धडकेत ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वसई-नायगाव परिसरात सोमवारी (२२ जानेवारी) रात्री घडली. सिग्नल निरीक्षक वासू मित्र यांच्यासह सोमनाथ लंबुरे आणि सचिन वानखेडे असे मृत तिघे कर्मचाऱ्यांचे नाव असून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , सिग्नलिंग हे डिपार्टमेंटमधील हे तीनही कर्मतारी सोमवारी रात्री सिग्नल यंत्रणेत झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेले होते. मात्र वसई रोड ते नायगाव अप मार्गावर जाणाऱ्या एका लोकलने त्यांना उडवलं. लोकलची धडक एवढी भीषण होती की त्या तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. रात्री 8 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघाताची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली. या दुर्दैवी घटनेनंतर मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत म्हणून 55 हजार रुपये रेल्वेकडून देण्यात आले आहेत. तर उर्वरीत रक्कम 15 दिवसात देण्यात येणार आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले सचिन वानखेडे आणि सोमनाथ लंबुरे यांच्या कुटुंबियाना 40 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तर मुख्य सिग्नल निरीक्षक वासु मित्र यांच्या कुटुंबियांना 1 कोटी 24 लाख रुपयांची मदत रेल्वेकडून मिळणार आहे. या अपघाता प्रकरणी पश्चिम रेल्वेनोेही चौकशीचे आदेश दिले आहेत.
Discussion about this post