राज्यात आगामी पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार आज राज्यातील २५ जिल्ह्यांना पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने ढगांनी आच्छादलेले राहणार असून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
उत्तर महाराष्ट्रात जोरदार कोसळणार
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर सोडून इतर सर्व जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट घोषित केला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात यलो, ऑरेंज अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून तेथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. साताऱ्यातील घाट भागासाठी हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मराठवाड्यासाठी यलो अलर्ट
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. परभणी आणि नांदेडच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अनुभव येण्याची दाट शक्यता आहे.
विदर्भात ऑरेंज, यलो अलर्ट
विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या आठ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. अकोला जिल्ह्यासाठी मात्र यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
25 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
दरम्यान, 8 जुलै रोजी राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार आहे. पुढील तीन दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Discussion about this post