इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मिनाब शहरातील एका शाळेवर बॉम्ब पडला असून या हल्ल्यात कमीत कमी २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या प्रांतीय राज्यपालांनी तस्नीम या इराणी वृत्तसंस्थेला दिली. निरपराध विद्यार्थ्यांचे बळी गेल्याने संपूर्ण इराणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिनाब हे इराणच्या दक्षिणेकडील होर्मोझगान प्रांतातील शहर आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यात या शाळेला थेट लक्ष्य करण्यात आले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती असून बचावकार्य सुरू आहे.
सर्वोच्च नेते खामेनी तेहरानबाहेर सुरक्षित ठिकाणी
शाळेवरील हल्ल्यासह तेहरानमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाले. सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या कार्यालयाजवळही हल्ले झाल्याचे वृत्त आहे. मात्र खामेनी सध्या तेहरानबाहेर सुरक्षित ठिकाणी असल्याचे इराणी माध्यमांनी सांगितले. अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हेही सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली.
इराणने (Iran) या हल्ल्यांना तातडीने प्रत्युत्तर दिले. इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इस्रायल संरक्षण दलाने (IDF) सांगितले की, “इराणकडून इस्रायलच्या भूभागावर क्षेपणास्त्रे डागण्यात आली असून ती रोखण्यासाठी संरक्षण यंत्रणा कार्यरत आहे.” जेरुसलेममध्ये सायरन वाजवण्यात आले आणि नागरिकांना “अत्यंत गंभीर” धोक्याचा इशारा देण्यात आला.
युद्ध आणखी चिघळणार –
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या “मोठ्या लष्करी कारवाईस” सुरुवात झाल्याचे जाहीर केले. ही कारवाई अनेक दिवस सुरू राहण्याची शक्यता रॉयटर्सने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वर्तवली आहे. इराणचे समर्थक असलेले येमेनमधील हुथी बंडखोरही आजच इस्रायल आणि शिपिंग मार्गांवर हल्ले करू शकतात, असे वृत्तसंस्था AP ने सांगितले आहे. ट्रम्प यांनी स्वतः मान्य केले की या कारवाईत अमेरिकी सैनिकांचे बळी जाण्याचीही शक्यता आहे.
शाळेवरील हल्ल्यात निरपराध मुलांचे बळी गेल्याने हे युद्ध आता केवळ लष्करी संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही — त्याच्या झळा सामान्य नागरिकांपर्यंत, विशेषतः लहान मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत.














Discussion about this post