नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं काढलेल्या मिरवणुकीत डीजे सुरू असताना डीजेच्या आवाजामुळे एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नाशिकमधील पेठ रोडवरील फुलेनगर येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन फकिरा रणशिंगे (वय २३, रा. ओमकार बाबा गल्ली, महात्मा फुले नगर , पेठ रोड, पंचवटी ) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंचवटीतील पेठ रोड भागात रविवार (दि.13) रोजी मिरवणूक काढण्यात येत असते. संपूर्ण पेठ रोडवर परिसरात डीजेवर गाण्याची धूम सुरू होती. या दरम्यान नितीन रणशिंगे याला महात्मा फुले नगर येथील पुतळ्याजवळ डिजे चालू असताना आवाजाचा त्रास झाल्याने तोंडातून व कानातून रक्तस्त्राव झाला.
त्याला तातडीने रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, नितीन या तरूणाला क्षयरोगाचा त्रास असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टेम अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल. तरूणाचा मृत्यू डी जेच्या मोठ्या आवाजामुळे झाला की, इतर आरोग्यविषयक कारणांमुळे झाला, हे निष्पन्न होणे बाकी आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार किरण सानप हे करीत आहेत.
Discussion about this post