भंडारा : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भाताची लावणी सुरू याच दरम्यान, वीज कोसळून 20 महिला जखमी झाल्याची घटना जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळा या गावात घडली. या सर्व महिलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपासून विदर्भात सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर पुढचे काही दिवस कमी होण्याची शक्यता आहे. मात्र नागपूर व भंडारा जिल्ह्यात आणखी एक दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने या दोन जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. भंडाऱ्यात भातलावणी मोठ्या प्रमाणावर होत असते. भाताची लावणी सुरू असतानाच महिलांच्या अंगावर वीज कोसळली.
या दुर्घटनेत २० महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना जवळच्या अड्याळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार सर्व महिलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
विदर्भात कुठे मुसळधार तर कुठे हलक्या पावसाचा अंदाज
पुढचे २४ तास नागपूर, भंडारा जिल्ह्यात मुसळधार; तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात हलक्या ते मध्यम पावसाचा वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे. पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. दोन दिवस जोर कमी राहील; पण त्यानंतर पुन्हा पाऊस रौद्ररुप धारण करण्याचा अंदाज आहे.
Discussion about this post