नोव्हेंबर महिना सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. खरंतर प्रत्येक महिन्यात नियमात काही ना काही बदल होतो. अशातच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला अनेक नियमात बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांवर दिसेल. नेमके काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊया..
LPG सिलेंडरच्या किंमतीत बदल
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. त्या नवीन भाव जाहीर करतात. यावेळी 1 नोव्हेंबर रोजी सरकार दिवाळीत ग्राहकांना झटका देते की दिलासा देते हे उद्या समोर येईल. गेल्या काही महिन्यांपासून 14 किलोग्रॅम गॅसची किंमत कमी होण्याची मागणी करण्यात येत आहे. 19 KG एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती जुलै महिन्यात घसरल्या होत्या. त्यानंतर त्यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे.
तेल विपणन कंपन्या दरमहा सीएनजी आणि पीएनजी गस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. गेल्यावेळी किंमतीत वाढ झाली होती. यावेळी विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किंमतीत कपातीचे संकेत मिळत आहेत.
पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?
पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. सरकारी तेल कंपन्यांनी काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाहतुकीचा आंतरराज्य खर्च समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी इंधनाचे दर कमी होण्याचा अंदाज आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती निच्चांकी स्तरावर आहेत. प्रति बॅरल 72 डॉलर असे भाव आहेत.
क्रेडिट कार्डबाबतचा नियम
1 नोव्हेंबरपासून एसबीआय कार्डसंबंधीच्या नियमात बदल होणार आहे. आता सिक्युर्ड एसबीआय क्रेडिट कार्डवर दरमहा 3.75 रुपयांचा अतिरिक्त भार ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. तर वीज, पाणी, एलपीजी, गॅससह इतर युटिलिटी सेवांवर 50 हजार रुपयांच्या वरील पेमेंटसाठी 1 टक्का अधिक भार सहन करावा लागणार आहे.
ट्रेन तिकीटासंबंधी बदल
भारतीय रेल्वेच्या आगाऊ तिकीट राखीव करण्याचा कालावधी आता घटवण्यात आला आहे. 1 नोव्हेंबरपासून 120 दिवसांऐवजी आता 60 दिवसांचा हा कालावधी असेल. या नवीन प्रणालीमुळे तिकीट खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित होईल असा दावा करण्यात येत आहे.
TRAI च्या नियमांमध्ये बदल
एक नोव्हेंबरपासून ट्रायच्या नियमामंमध्ये बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम जियो, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनलच्या युझर्सवर होणार आहे. TRAI नं सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना 1 नोव्हेंबरपासून मेसेट ट्रेसिबिलिटी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या सर्व मेसेजचा मागोवा घेणे शक्य आहे. सर्व प्रकारचे फर्जी कॉल तसंच मेसेज थांबवण्याची नवी पद्धत असेल. त्यामुळे फसवणुकीच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. अर्थात याचा काही तोटा देखील आहे. हा नियम लागू झाल्यानंतर ओटीपी मिळायला उशीर होऊ शकतो. त्याचा सर्वात मोठा फटका ऑनलाईन पेमेंट करताना होण्याची शक्यता आहे.