ईशान्येकडील मिझोराम राज्यातून बुधवारी सकाळी हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथे सायरंगजवळ एक बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला, या दुर्घटनेत 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. अजूनही 30-40 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.
वृत्तानुसार, हा रेल्वे पूल सायरंगजवळ कुरुंग नदीवर बांधला जात होता. त्यामुळे बैराबी आणि सायरंग भागातील संपर्कावर परिणाम झाला आहे. खाली पडलेल्या रेल्वे खांबाची उंची सुमारे 104 मीटर आहे, म्हणजेच कुतुबमिनारच्या उंचीपेक्षा तो 42 मीटर जास्त आहे.
पीएम – मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख
पंतप्रधान मोदींनीही मिझोरम रेल्वे पूल दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पीएमओने ट्विट केले आहे की, “मिझोरममधील पूल दुर्घटनेत शोकाकूल झालेल्या लोकांप्रती मी शोक व्यक्त करतो, जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMMRF) मधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जे जखमी झाले आहेत त्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला
हा बांधकामाधीन पूल मिझोरामची राजधानी आयझॉलपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची डे यांनी सांगितले की, अपघातानंतर संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत.
मिझोरमचे मुख्यमंत्री झोराम थांगा यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले आहे की, ऐजॉलजवळील सैरांग येथे बांधकामाधीन ओव्हर ब्रिज कोसळला असून, त्यात १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.