जळगाव : पाचोरा नजीक परधाडे रेल्वेस्थानकानजीक ‘पुष्पक एक्स्प्रेस’च्या डब्याला बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागल्याच्या अफवेमुळे डब्यातील प्रवाशांनी भीतीपोटी रुळावर उड्या मारल्या आणि त्याचवेळी समोरून सुसाट वेगाने आलेल्या ‘बंगळूर एक्स्प्रेस’खाली सापडून 13 प्रवासी जागीच ठार झाले. यामध्ये नेपाळच्या तीन प्रवाशांचा समावेश आहे; तर 19 प्रवासी जखमी झाले.
जळगावहून पाचार्याकडे निघालेल्या ‘पुष्पक एक्स्प्रेस’च्या चालकाने परधाडे स्थानकाजवळील एका वळणावर गाडीचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावला. गाडीचा वेग कमी होत असताना एका डब्याच्या चाकाजवळून अचानक मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. या डब्यात दरवाजात बसलेल्या तरुणांनी त्यामुळे डब्याला आग लागल्याचा आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट उडाली. गाडी थांबताच या तरुणांसह सुमारे 100 प्रवासी रुळावर उतरले.
प्रवाशांनी रेल्वेतून उड्या टाकल्या. त्याचवेळी ‘न्यू दिल्ली-बंगळूर एक्स्प्रेस’ सुसाट वेगाने जळगावकडे येत होती. जोरदार वेगामुळे या एक्स्प्रेसच्या चालकाला गाडीचा वेग कमी करण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे रेल्वे रुळावर उभे असलेले १३ प्रवासी अवघ्या दोन ते तीन सेकंदांत चिरडले गेले. रेल्वे रुळावर प्रवाशांच्या मृतदेहाचे तुकडे सर्वत्र विखुरलेले होते. हे भीषण द़ृश्य पाहून अन्य प्रवाशांच्या अंगावर काटा आला. या दुर्घटनेत १९ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले.
अपघातातील मृतांची नावे
१. कमला नवीन भंडारी (वय ४३, रा. कुलाबा, मुंबई), २. लच्छीराम रवयू पासी (वय ४०, नेपाळ), ३. इम्तियाज अली (वय ३५, रा. उत्तर प्रदेश), ४. नसुरुद्दीन बहुद्रदीन सिद्दीकी (वय १९, रा. उत्तर प्रदेश),५ जवकला भटे जयकडी (वय ८०, नेपाळ) ६. हिनु नंदराम विश्वकर्मा (वय १९, रा. नेपाळ) ७. बाबु खान (वय २७, रा. उत्तर प्रदेश), ८. अनोळखी महिला, उर्वरित मयत हे पुरुष असून त्यांची ओळख पटलेली नाही.
Discussion about this post