देशातील अनेक ठिकाणी सध्या अवकाळी पाऊस होताना दिसत असून याच दरम्यान पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सरकारी अधिकाऱ्याने माहिती दिली. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जिल्हा प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे, असे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगामध्ये गुरुवारी विजांचा गडगडाट सुरु होता. यात अनेक ठिकाणी वीज पडली. यात अनेकजण गंभीर जखमी झाले. जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. उपचारादरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे.
मालदा येथील सहापूर परिसरात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. चंदन सहानी (४०), मनजित मंडल (२१), राज मृध्दा (१६) असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर गजोळ येथे वीज पडून असित साहा या १९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
माणिकचकच्या मोहम्मद टोला येथील राणा शेख (८) यांचा मृत्यू झाला आहे. तर नयन रॉय (२३)आणि प्रियंका सिंघा (२०)या जोडप्यालाही आपला जीव गमवावा लागला आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशभरात आज १७ मे रोजी राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर मध्यप्रदेश, महाराष्ट्रासह १४ राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली.
Discussion about this post