जळगाव – शहरातील लहान दुकानदारांना (हॉकर्स) स्वाभिमानाने व शिस्तबद्ध पद्धतीने रोजगार करण्याची संधी मिळावी यासाठी मराठी प्रतिष्ठान तर्फे एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत जळगाव शहरातील १०० हॉकर्सना शासकीय योजनेद्वारे ई-रिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार असून, या रिक्षांचा उपयोग चालते-फिरते दुकाने म्हणून केला जाणार आहे.
“श्रम कमी, जास्त आर्थिक उत्पन्न” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमामुळे भाजीपाला, फळे, आईस्क्रीम-लस्सी, पाणीपुरी, पाणी जार, कटलरी साहित्य, ब्रेड-बटर तसेच शुभेच्छा पुष्पगुच्छ विक्रेत्यांसह अनेक लघु व्यावसायिकांना फायदा होणार आहे. केवळ ५० रुपयांच्या खर्चात दिवसभर शहरभर सहज व्यवसाय करता येणार असून, अरुंद गल्ल्यांमध्येही पोहोचण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रोजगारासोबतच शहर अतिक्रमणमुक्त करण्याची संकल्पना. फुटपाथ व रस्त्यांवरील अतिक्रमण कमी होऊन शहर अधिक शिस्तबद्ध, स्वच्छ व सुसंस्कृत बनेल. पर्यावरणपूरक ई-रिक्षा प्रदूषणमुक्त असून पर्यावरण रक्षणासही हातभार लावणार आहेत.
शासकीय अनुदान आणि बँकांमार्फत अर्थसाह्य मिळविण्यासाठी मराठी प्रतिष्ठान सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले.
“हॉकर्सच्या आर्थिक प्रगतीसोबतच शहराचा विकास, स्वच्छता आणि शिस्त या तिन्ही बाबी साध्य करणे हीच मराठी प्रतिष्ठानची भूमिका आहे. ई-रिक्षा ही काळाची गरज असून समाजहितासाठी उचललेले हे उपयुक्त पाऊल आहे,” असे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ॲड. जमील देशपांडे, अध्यक्ष, मराठी प्रतिष्ठान, कार्यालय, गणपती नगर, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post