मुंबई/जळगाव : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा तीव्र फटका बसत आहे. हवामान खात्याच्या ताज्या अहवालानुसार काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. विशेष जळगाव आणि मालेगाव ही राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरे ठरली असून रविवारी येथे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून सोमवारीही तापमान चढे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, कोकण किनारपट्टी भागात तुलनेने तापमान कमी असले तरी दमट उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ठाणे, पालघर आणि रायगड येथे किमान तापमान सुमारे २४ अंश, तर कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दिवसभर दमट वातावरणामुळे घामाच्या धारा लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे मध्येही उष्णतेची तीव्रता वाढली असून पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. सोमवारी तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोहगाव आणि कोरेगाव पार्क परिसरात उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवत आहे.
विदर्भात अकोला येथे शनिवारी तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले होते, तर रविवारीही उन्हाचा कडाका कायम होता. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे मिळालेला दिलासा आता संपुष्टात आला असून पुन्हा तापमान वाढू लागले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नाही. सोलापूर मध्ये तापमान ४१.४ अंशांवर पोहोचले, तर सांगली आणि जेजुरी येथेही पारा ४० अंशांवर नोंदवला गेला. नागपूर जिल्ह्यातही तापमान झपाट्याने वाढत असून रविवारी ते ३९.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
हवामान विभागाने राज्यात येत्या काही दिवसांत ‘उष्णतेची लाट’ येण्याचा इशारा दिला असून नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post