जळगाव: मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे. मात्र तो कसा होईल आणि कुठे होईल याचा नेम नाही. दरम्यान, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात पोहोत असताना तरुणाला अचानक फिट आला. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. राजू भूरा भिल (वय-३५ रा. पिंपळकोठा ता.एरंडोल जि.जळगाव) असे मयत तरूणाचे नाव असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे वास्तव्याला असलेला राजू भिल हा तरूण गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, राजू हा फिट या आजारामुळे त्रस्त होता. त्यातच नदीपात्राच्या पाण्यात पोहत असताना त्याला अचानक फिट आले. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील हे करीत आहे.
Discussion about this post